अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी
। अल्बेनिया । वृत्तसंस्था ।
भारताचा 18 वर्षीय कुस्तीपटू चिराग चिक्काराने भीम पराक्रम केला आहे. त्याने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. चिरागने मुलांच्या फ्री स्टाईल 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याचा कारनामा केला आहे. अल्बेनियातील तिराना येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात चिरागने किर्गिस्तानच्या अब्दिमालिक काराचावचा 4-3 अशा फरकाने पराभव केला आहे.
चिरागने सुरुवातीपासूनच त्याचा चांगला खेळ केला होता. पहिल्या फेरीत त्याने जपानच्या गाटुको ओझावाला 6-1 अशा फरकाने पराभूत केले होते. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या लुनूस लावबातिरोवला 12-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला होता. त्याने उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या ऍलन ओरालबेक याला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. विशेष म्हणजे चिराग 16 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला जवळपास 3 वर्षे स्पर्धात्मक कुस्तीपासून दूर रहावे लागले होते. परंतु, त्याने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुनरागमन करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सुवर्णपदक जिंकणारा दुसराच पुरुष
चिराग हा जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा दुसराच पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. यापूर्वी 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात पहिल्यांदा सुवर्णपदक 2022 साली अमन सेहरावतने जिंकले होते. त्याच्यानंतर आता चिरागनेही सुवर्णपदक जिंकले आहे. तथापि, भारताच्या रितिका हुडाने महिला गटात 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 2023 साली सुवर्णपदक जिंकण्याचा कारनामा केलेला आहे.