भिवपुरी रेल्वे परिसर चिखलमय

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून डिकसळ गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला आहे. भिवपुरी स्थानकातुन लोकल प्रवास करणारे 50 टक्केहुन अधिक प्रवाशांना याच मार्गाने स्थानकात यावे लागत असल्याने प्रवासी संतप्त आहेत. याबाबत भिवपुरी रोड प्रवासी संघटनाने मध्य रेल्वे प्रशासनाने याकामी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून पूर्व आणि पश्‍चिम दिशेकडे जाण्यासाठी पादचारी पुलाचा अवलंब करावा लागतो. त्यात डिकसळ भागाकडे मोठी लोकवस्ती स्थानकात लोकल प्रवास करण्यासाठी येत असते. डिकसळ भागातील स्थानकाकडे रस्त्यात नाला खोदण्यात आला होता. त्यावेळी तेथे टाकलेली मोरीचे काम अर्धवट अवस्थेत राहिल्याने रस्त्यावर माती पडून राहिली आणि त्यानंतर पाऊस सुरु झाल्यावर चिखलमय हा परिसर बनला आहे.

यावर उपाययोजना म्हणून उमरोली ग्रामपंचायतने त्या ठिकाणी खडी दगड टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतली नाही आणि त्यामुळे पुन्हा त्या भागातील रस्त्यात केवळ पाण्याची डबके आणि खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन यांनी या चिखलमय रस्त्याकडे लक्ष द्याव, अशी मागणी करणारे निवेदन भिवपुरी रोड रेल्वे स्थानक प्रवासी संघटने कडून देण्यात आले आहे.

Exit mobile version