मतिमंद मुलांचा सामुदायिक वाढदिवस साजरा

स्नेह स्पंदन संस्थेचा पुढाकार

| चणेरा | प्रतिनिधी |

स्नेह स्पंदन ही शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली तब्बल 11 वर्षे रोहा येथील मतिमंद मुलांच्या प्रेरणा विद्यालयात विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस सातत्याने साजरा करत असून, यावर्षीही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती शेळके यांच्या संकल्पनेतून सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी हा हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांचे औक्षण करून करण्यात आली. त्यानंतर केक कापून मुलांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह सर्वांनाच भावून गेला. त्यानंतर क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोहा नगरपरिषदेच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे, केंद्र प्रमुख ईश्वर लाडे, त्वष्टा कासार समाज अष्टमीचे अध्यक्ष हेमंत साळवी व सभासद, त्वष्टा कासार महिला अध्यक्षा रूपाली सचिन वडके, शिव आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण खुळे, निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगडचे प्रथमेश कोळी, ब्रह्मकुमारी पूनम दीदी, जयश्री भांड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
मनोगत व्यक्त करताना अध्यक्षा स्वाती शेळके म्हणाल्या, ही परंपरा आम्ही गेल्या 11 वर्षांपासून जपली आहे. वाढदिवस साजरा करताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद शब्दात मांडता येणार नाही. या सोबतच संस्थेच्या ‌‘श्री शिधा‌’ व ‌‘यशवंती पुरस्कार‌’ या उपक्रमांमध्ये अधिकाधिक दानशूर व्यक्ती व नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version