खलाशी-तांडेलातील वाद विकोपाला
| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
मासेमारीसाठी गेलेल्या नौकेवरील खलाशी आणि तांडेल यांच्यातील वाद विकोपाला जात नौकेवरील तांडेलाचा खून करून थेट नौका पेटवल्याची घटना घडली आहे. कुणकेश्वरपासून खोल समुद्रात 15 वावाच्या अंतरावर ही घटना सोमवारी दुपारी घडली. यात बोटीचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा (रा. छत्तीसगड) हा तांडेलाचा खून करून नौकेवरून उडी मारून पलायन करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विश्वकर्मा हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते. नौकेवरील तांडेलाचा खून करून नौकेला आग लावल्यानंतर नौकेच्या मागील बाजूस असलेल्या छोट्या होडीत जाऊन तो बसला. दरम्यान, घटनास्थळी गस्तीनौकेने गेलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत देवगड बंदरात आणले. त्यानंतर त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी- राजीवाडा येथील नुमान रफिक फणसोफकर यांच्या मालकीची नुझत राबिया ही नौका रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारीसाठी निघाली. सोमवारी कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी आणि तांडेल यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर नौकेवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याने तांडेल रवींद्र नाटेकर (रा. गुहागर) याचा खून करून नौका पेटवून दिली. विश्वकर्मा याने नौका पेटविल्यानंतर नौकेमागील असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला. नौकेने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच आणि नौकेवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने केलेली आरडाओरड ऐकून नजीकच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच नौकेवरील खलाशांनादेखील वाचविण्याचा प्रयत्न केला. या नौकेवर तांडेलासह एकूण 26 खलाशी होते.
या घटनेची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली. त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस शाखेस माहिती दिली. सागर पोलीस दलाच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले. यावेळी देवगड बंदरातून म्हाळसा मल्हार या नौकेने घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. b