15 दिवसांपासून मासेमारी बंद
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
होलिकोत्सव हा कोळी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणार्या मुरूड तालुक्यातील सुमारे 400 नौका 15 दिवसांपासून गावाकडे आल्या आहेत. रविवारी रंगपंचमीला होळीचे विधीवत पूजन करून विझवली की, या नौका सोमवारी पुन्हा मुंबईकडे निघतील, अशी माहिती मुरूड सागरकन्या मच्छिमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांनी शनिवारी दिली.
नौका बंद असल्याने मासळीची उपलब्धता खूपच घटली असून, स्थानिक पातळीवरील नौकांची मासेमारीदेखील बंद असल्याने मुरूड मार्केटमध्ये जेमतेम खाडीची अथवा बाहेरून मासळी येत आहे. मासळीचे दर परवडणारे नाहीत असे दिसून येते.
श्री. बैले म्हणाले की, दरवर्षी गणेशोत्सवाप्रमाणेच होलिकोत्सवाला मुंबईत मासेमारी करणार्या तालुक्यातील नांदगाव, मुरूड, एकदरा, राजपुरी, बोर्ली येथील नौका किमान 15 दिवसांची सुट्टी घेऊन होळी सणात सामील होत आनंद लुटतात. होळी सणाची खरी समाप्ती ही रंगपंचमीनंतर होत असते. रंगपंचमीच्या दिवशी मुरूड कोळीवाड्यातील महिला कळशीने समुद्रातील पाणी आणून मुख्य होळीवर शिंपडून होळी विझवली जाते. त्यानंतर होलिकोत्सवाची खर्या अर्थाने समाप्ती होते, अशी कोळी बांधवांची भावना असल्याचे मनोहर बैले यांनी सांगितले.