मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; अलिबाग आगार सज्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवार (दि. 26) पासून मांडवा ते गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई-रायगडदरम्यान जलमार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसह पर्यटकांचा भार आता राज्य परिवहन महामंडळावर पडणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांना वेळेवर आणि सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, कर्जत आणि पेण आगारातूनही अतिरिक्त बसेस मागविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्याने सध्या रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने अनेकांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रायगडकडे मोर्चा वळवला आहे. काही जण आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत, तर अनेक पर्यटक समुद्रकिनारे, किल्ले आणि विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
शनिवार आणि रविवारी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबईहून कमी वेळात रायगडमध्ये पोहोचण्यासाठी पर्यटक जलवाहतुकीला अधिक पसंती देत होते. रो-रो सेवेसह पीएनपी, मालदार आणि अजंठा या प्रवासी बोटींच्या सेवेला मोठी मागणी होती. अवघ्या पाऊण तासात अलिबागमध्ये पोहोचता येत असल्याने जलवाहतूक ही पर्यटकांची पहिली पसंती ठरत होती.
मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने वातावरणात बदल होऊ लागला असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने 26 मेपासून जलवाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून मांडवा-गेटवे मार्गावरील प्रवासी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जलवाहतुकीचा पर्याय बंद झाल्याने आता पर्यटक आणि प्रवाशांचा मोठा भार एसटी महामंडळावर येणार आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेता अलिबाग आगारातून विनाथांबा फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच कर्जत आणि पेण आगारातून अतिरिक्त बसेस मागविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी फेऱ्या वाढविण्याचे नियोजन असल्याची माहिती अलिबाग आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.
जलवाहतूक सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी अलिबाग आगाराकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. विना थांबा फेऱ्या वाढविण्यात येणार असून, कर्जत आणि पेण आगारातून अतिरिक्त बसेस मागविल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेऊन गरजेनुसार आणखी बससेवाही वाढविण्यात येईल. प्रवासी आणि पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेत पोहोचता यावे, यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत.
राकेश देवरे,
आगार व्यवस्थापक, अलिबाग एसटी आगार
