पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून यशस्वी शोध
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या डोंगररांगेत असलेल्या विकटगड अर्थात पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एक तरुण हरवला होता. त्याबाबत पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तर नेरळ पोलीस ठाणे येथे त्या 18 वर्षीय तरुणाचे पालक आले होते. दरम्यान, माथेरान आणि नेरळ पोलीस ठाणे यांची पथके तसेच माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्याकडून 24 तासांच्या तपासानंतर संबंधित तरुणाचा मृतदेह 1000 फूट दरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
रविवारी मुंबईमधील कांदिवली येथील 18 जणांचा ग्रुप पेब किल्ल्यावर गड भ्रमंतीसाठी आले होते. निखिल तनिर हा तरुण वगळता अन्य सर्व ट्रेकर्स हे वयाने पन्नाशी पुढील होते. रविवारी हे सर्व ट्रेकर्स पेब किल्ला फिरून मुंबईकडे परत जात असताना आपल्यातील एक ट्रेकर्स आपल्यासोबत नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्या ट्रेकर्सकडून पनवेल पोलीस ठाणे येथे निखिल तनिर हा तरुण पेब किल्ला येथे हरवला असल्याची नोंद केली. त्यानंतर पनवेल पोलीस ठाणे आणि तेथील रेस्क्यू टीम यांच्याकडून दोन दिवस पेब किल्ल्याचे काही भाग पिंजून काढण्यात आला; परंतु निखिलचा शोध लागला नव्हता.
बुधवारी त्या तरुणाचे पालक, पनवेल पोलीस ठाणे आणि नंतर नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचले. त्यानंतर नेरळ पोलीस आणि माथेरान पोलीस पेब किल्ल्यावर तपास सुरु होता. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, नेरळ पोलीस ठाण्याचे हवालदार निलेश वाणी, नागरगोजे, बारगजे, मोरे यांनी माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमसोबत सर्च मोहीम सकाळी आठ वाजता सुरु केली. सह्याद्री रेस्क्यू टीम मधील एका सदस्याला सायंकाळी काळोख पडताना एक कापड दरीमधील कपारीत दिसून आले. त्यानंतर रात्री आठ वाजता किल्ल्यावरून एक हजार फूट दरीत निखिलचा मृतदेह आढळून आला. मृतदेह चार दिवस तेथे असल्याने सडलेल्या अवस्थेत होता. शेवटी चादरीमध्ये बांधून तो मृतदेह दरीमधून मुख्य गडावर मध्यरात्री दोन वाजता आणण्यात आला.
गुरुवारी (दि.18) पहाटे 6 वाजताच्या दरम्यान नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या रेस्क्यु ऑपरेशनला माथेरान सह्याद्री रेस्क्यु टिमचे वैभव नाईक, सुनिल कोळी, दिनेश सुतार, सुनिल ढोले, चेतन कळंबे,संदीप कोळी, धिरज वालेंद्र, उमेश मोरे, मंगेश उघडे, राहुल चव्हाण, महेश काळे यांच्यासह अनेक तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते.