वीर यशवंतराव घाडगे यांचे शौर्य अतुलनीय

प्रांताधिकार्‍यांचे प्रशंसोद्गार; माणगावमध्ये अभिवादन

| माणगाव | प्रतिनिधी |

शहीद वीर घाडगे यांनी दुसर्‍या महायुद्धात अतुलनीय असे शौर्य गाजविले. असे गौरवोद्गार माणगाव प्रांत उमेश बिरारी यांनी माणगाव येथे वीर घाडगे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलताना काढले.

शहीद वीर यशवंतराव घाडगे, व्हिक्टोरिया क्रॉस मानचिन्हधारक (मरणोत्तर) यांची जयंती समारंभ सोमवारी (दि.9) उपविभागीय अधिकारी, माणगाव उपविभाग माणगाव यांच्या कार्यालयासमोरील प्रांगणात सकाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रांताधिकारी उमेश बिरारी यांनी भूषविले. या समारंभाला घाडगे उत्सव समितीच्या सचिव माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, कर्नल प्रकाश चव्हाण, सुभेदार मेजर चंद्रकांत निगडे, सुभेदार मेजर श्री.शेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वैशाली पाटील, वीर घाडगे यांचे नातू सुभाष घाडगे, माजी सैनिक संघटना माणगाव अध्यक्ष विष्णू सावंत, नरसिंगराव कदम, सामाजिक कार्यकर्ते संजय आण्णा साबळे, घाडगे कुटुंबीय, आदी मान्यवरांसह नागरिक, महसूल खात्याचे कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविका, नागरिक, पोलीस अधिकारी कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरारी पुढे म्हणाले दुसर्‍या महायुद्धात यशवंतराव ब्रिटिश सैन्यासमोर निधड्या छातीने लढून त्यांना वीरमरण आले. ब्रिटिश प्रशासनाने त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस दिला, अशी माहितीही त्यांनी दिली.

सैन्यदलातील सैनिकांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांमार्फत ध्वजनिधी गोळा करण्यात येऊन तो निधी सैनिकांपर्यंत पोहचला पाहिजे. त्या निधीचा विनियोग सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो.

उमेश बिरारी
प्रांत

प्रास्ताविक तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांनी केले. यावेळी कर्नल प्रकाश चव्हाण, सुभेदार मेजर चंद्रकांत निगडे, श्री.शेख, हेगडे मॅडम यांनीही घाडगे यांच्या पराक्रमाचे कौतुक करीत त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण, पोलीस मानवंदना होऊन अशोकदादा साबळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचालन शिक्षक बारटक्के यांनी केले तर माजी सैनिक संघटना अध्यक्ष विष्णू सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Exit mobile version