निकृष्ट कामाचा बुरखा फाटला; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील खानाव गावाजवळील पुलाला अवघ्या दोन वर्षांतच मोठे भगदाड पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जाहीन कामकाजाचा पर्दाफाश झाला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश नारायण पाटील यांनी केली आहे.
याबाबत ॲड. पाटील यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत अलिबाग-रोहा मार्गावरील खानाव गावाजवळील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित ठेकेदाराने करारातील अटींचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे काम केले असून, प्रत्यक्ष काम पूर्ण न करताच शासकीय निधीची बिले काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता तपासणी (क्वालिटी ऑडिट) करण्यात यावी, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), बिले, देयक नोंदी, पूर्णत्व प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या ठेकेदार, अभियंते आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच पुलाची तातडीने दुरुस्ती करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
वाहतुकीत बदल
रोहाकडून अलिबागकडे येणारी वाहने वावे-चौल-नागाव मार्गे अलिबागकडे वळविण्यात आली आहेत. अलिबागकडून रोहाकडे जाणारी वाहने सहाण बायपास- पाल्हे पूल-चौल-वावे मार्गे वळविण्यात आली आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अलिबाग-रोहा रस्ता हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. निकृष्ट दर्जाची कामे करून शासकीय निधीचा अपव्यय होत असेल, तर त्याची जबाबदारी केवळ ठेकेदाराची नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांचीही आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही.
ॲड. राकेश नारायण पाटील,
सामाजिक कार्यकर्ते
