सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्काळजीपणा; वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातून जाणाऱ्या कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या लहान पूल वाहतुकीस बंद आहे. जून 2025 पासून हा पूल वाहतुकीस बंद असल्याने वाहनांची कोंडी तेथे होत असून मागील सात महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अथवा नवीन पूल बांधण्याची कार्यवाही केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळे नेरळ गावात खांडा पुलाच्या परिसरात स्थानिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हा पूल जून 2025 पासून बंद असून देखील बांधकाम खात्याला किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांना कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल किमान 40 ते 50 वर्षे जुना असून, या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे. त्यानंतर मागील 10 वर्षेआधी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात आला. 27 जून 2025 रोजी सायंकाळच्या वेळी या पुलाचा पाया खचला असल्याचे आणि कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेतल्यावर स्थानिक लोकांनी पूल वाहतुकीस बंद केला. त्यानंतर जवळच असलेल्या नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिसांनी पुलाची पाहणी करून पूल वाहतुकीस तात्काळ बंद करण्यात आला. 28 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उरण येथून कर्जत-नेरळ भागात येऊन पुलाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी पुलाची स्थिती लक्षात घेऊन पूल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी त्या पुलावरून कोणतेही वाहन ये-जा करू नये यासाठी लोखंडी पाईप लावून पूल वाहतुकीस बंद केला.
जून 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत यापुलावरील वाहतूक बंद आहे. पावसाळा संपून तीन महिने लोटले आहेत; तरी देखील जुन्या बंद ठेवलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधला गेलेला नाही आणि बांधकाम देखील सुरु झालेले नाही. पुलाचे बांधकाम त्या पुलाची लांबी लक्षत घेता दोन महिन्यात पूर्ण होऊ शकले असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम सुरूच केले नसल्याने पूल तेथे रस्ता वाहतुकीस बंद आहे. माथेरानसारख्या पर्यटनस्थळाकडे जाणारी प्रवासी वाहने याच रस्त्याने ये-जा करीत असतात. असे असताना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे.
एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही
रस्त्याची देखभाल दुरुस्ती खारपाटील कंपनीकडे आहे. त्यांनी या रस्त्याचे मागील दहा वर्षांत एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले गेलेले नाही. त्याचवेळी पूल वाहतुकीस बंद होऊन सात महिने लोटले तरी बांधकाम विभाग नवीन पुलाचे काम सुरु करीत नसल्याने बांधकाम खात्याच्या अशा कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
