| रसायनी | वार्ताहर |
चौक हद्दीतील वावंढळ गाव आणि कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीला जोडणारा पुल धोकादायक स्थितीत असल्याचे राजिप बांधकाम विभागाने जाहीर केले आहे. तसेच, या पूलाचा वापर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोयना प्रकल्पग्रस्त वसाहती शेजारी शिवकालीन तलावाजवळील नाल्यावर जुना अरुंद व कमी उंचीचा पुल आहे. हा पूल शिवकालीन तलावाजवळ असून, मूळ वावंढळ गाव व कोयना प्रकल्पग्रस्त वसाहत यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्याच पूलावरून प्राथमिक शाळा वावंढळ, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची विहीर आणि ग्रामस्थांच्या सर्व शेत जमिनीकडे जाण्याचा मार्ग आहे. त्याच पूलाच्या पलिकडील भागात नागरी वसाहत उभी राहत असून त्यांनाही याच पूलाचा वापर करावा लागत आहे. हा पूल उंचीने कमी आहे. पावसाळ्यात पूलाखालून पाणी जाण्यासाठी एकच गाळा असल्याने व डोंगर भागातून, परिसरातील शेतातून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे या पुलाची वाईट अवस्था झाली आहे. त्याबाबत माजी सरपंच अर्जुन कदम यांनी रायगड जिल्हा परिषद यांच्या बांधकाम विभागाला कळविले होते. यादरम्यान, या पूलाचा वापर करू नये अशा संदर्भाचा फलक रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाने लावला आहे. तसेच, पूलावरून पाणी जात असल्यास जड वाहने घेऊन जाऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
वावंढळ गावातील पूल धोकादायक
