महामार्गावरील कळमजे नदीवरील पूल धोकादायक

महाड सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी नवीन पूल उभारावा
| माणगाव | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. पावसाळा जवळ आल्याने या पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने उपाययोजना आखणे गरजेचे होते. महाड सावित्री नदी येथील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच या नदीवरील पूल नव्याने उभारण्याकडे शासनांनी दुर्लक्ष चालवले आहे. हा नवीन पूल कधी उभारणार, असा सवाल नागरीकातून उपस्थित केला जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून अवघ्या दोन कि.मी अंतरावर कळमजे गावच्या फाट्यावर गोद नदी असून, या नदीवर ब्रिटिशकालीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून, हा पूल दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. हा पूल तळ कोकणासह तळ कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. पावसाळ्यात हा पूल कोसळल्यास कोकणात येणार्‍या व जाणार्‍या वाहनांना कोलाड, विळे निजामपूर मार्गे माणगाव, महाड असा प्रवास करावा लागेल, तर श्रीवर्धन, म्हसळा जाणार्‍या वाहनांना इंदापूर, तळेगाव, साईमार्गे प्रवास करावा लागेल. पावसाळ्यात दरम्यानच्या रस्त्यावरही छोट्या नदीवर मोर्‍या असल्याने या मोर्‍यावरही पूर येतो, त्यामुळे वाहतूक पर्यायाने थांबते. गोद नदीवरील कळमजे येथील नवीन पूल बांधून त्याची उंची वाढवावी. जेणे करून भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल, यासाठी शासनाने पूल उभारावा, अशी मागणी होत आहे.

या पुलाची दुरुस्ती वेळोवेळी लिक्विड टाकून केली आहे. नवीन पूल बांधण्यासाठी सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. पुलाच्या बांधकामाचे टेंडरही निघाले असून, पावसाळ्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. पुलाची लांबी 35, तर रुंदी 16 मीटर असून, उंचीही वाढवली जाणार आहे.

श्री. माडकर, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
Exit mobile version