महिसदरा नदीपात्रावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई ग्रामपंचायत हद्दीतील महीसदरा नदीपात्रावरील पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असुन या पुलाचे तुटेलेले कठडे पुर्णपणे तोडून नवीन बांधण्यात आले आहेत. तसेच अखेरची घटका मोजणारा पुलाला बाहेरून डागडुजी करण्यात येत आहे परंतु जीर्ण अवस्थेत असणारा हा पूल किती दिवस तग धरू शकेल असा प्रश्‍न प्रवाशी वर्गातून आता उपस्थित केला जात आहे.

या पुलला 50 वर्षांहुन अधिक काळ लोटला असुन तो जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. यामुळे या दोन्ही बाजूच्या कठड्यांना दोरीचा आधार दिलेला होता. चार सहा महिन्यांपासून या कठड्यांचे काम सुरू आहे, तो अद्याप पूर्ण तत्वावर नाही कठड्यांचे मधील भाग आज देखील दोरीच्या आधारावर आहे. यावरुन जड अवजड वाहन गेला तर हा पुल पूर्णपणे हादरला जात असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अशा बातम्या वर्तमान पत्रातून अनेकदा प्रसिद्ध झाल्यावर पूल पूर्णपणे न कोसळता या पुलाचे तुटलेले कठडे नविन बांधण्यात आले व जीर्ण झालेला पुलाला खाल पासून वर पर्यंत नवा पॅस्टर करून तो बाहेरून नवीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

गेली अकरा ते बारा वर्षा पासुन मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सुरु असुन त्यात म्हणावी तशी प्रगती नाही. एकंदरीत कामाच्या वेगावरुन या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. या पुलाच्या बाजूला लॉकडाऊनमध्ये नवीन पुलाचे काम सुरु केले होते. ते तसेच अर्धवट स्थितीत ठेऊन जुन्या पुलाची डागडुगी करण्याचा प्रयत्न किती सफळ होईल का? यांनी शासनाच्या तिजोरीतील पैसे वाया जाईल. अशा दुर्लक्षमुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात अशा घटना न घडण्याअगोदर उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी, बांधकाम विभाग व संबंधीत व्यक्तींनी लक्ष देण्याची गरज आहे.

Exit mobile version