| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया संलग्न (क्रेडाई एमसीएचआय-नवी मुंबई) चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री, नवी मुंबईच्या सदस्यांनी भेट घेतली. बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांना भेडसाविणार्या समस्या त्याचसोबतच पोलीस व बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वय साधला जावा, याकरीता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रकाश बाविस्कर यांनी दिली.
एमसीएचआय नवी मुंबईचे सदस्य प्रकाश बाविस्कर यांच्यासमवेत अरविंद गोयल, मदन जैन, विजय लखानी यांनी पोलीस आयुक्त भारंबे यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नवी मुंबईत कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत आहे. परंतु, पोलीस आणि बिल्डर-व्यावसायिकांचा समन्वय होत नसल्याने दोघांमध्ये दरी निर्माण झाल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.व्यवसायिक अरविंद गोयल यांनी बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांसमोर असणार्या समस्या आयुक्तांकडे मांडल्या.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी बांधकाम व्यावसायिकांना भेडसाविणर्या समस्या सोडविण्यासाठी त्याचप्रमाणे विकासकांना काही समस्या असल्यास थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधण्याचे सांगितले. पोलिसांकडून सर्वोत्तोपरी सहकार्य लाभेल, असेही भारंबे यांनी आश्वासित केले.