अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार
| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील शेतकर्याच्या बैलाची चोरी करुन निर्जन स्थळी त्याची कत्तल करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित आरोपींनी सदर बैलाचे मांस एका गाडीत भरुन घटनास्थळावरुन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याबाबत आरोपींविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पेण पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता प्रकाश रामचंद्र शिंगरूत, रा. जुने आरटीओ ऑफिसच्या समोर स्वत:चा शिंगरूत वाडा नावाचा तबेला असून, त्यामध्ये दुभती जनावरे आहेत. याच जनावरांमध्ये राजा नावाचा एक बैल होता. तो 24 ऑक्टोबरला तबेलाच्या शेजारी असलेल्या गुरचारणातून गायब झाला. सगळीकडे शोधला तरी शोध लागला नाही. मात्र, दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास नंदन भोईर नामक व्यक्तीने प्रकाश शिंगरूत यांना फोन लावला आणि सांगितले की, विश्वेश्वर स्मशानभूमीच्या समोर कोणत्या तरी जातीच्या जनावराचे कुजलेले थोडे मांस दिसत आहेत. हे समजल्यावर प्रकाश शिंगरूत खात्री करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना आपल्याच बैलाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार पेण पोलीस ठाण्यात नोंदविली. साधारणतः बैल हा जर्सी जातीचा काळा पांढरा रंगाचा आखूड शिंगांचा 50 हजार रुपये किमतीचा होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेण विश्वेश्वर स्मशानभूमीच्या समोरील रिंगरोडच्या कडेला रात्री तीन वाजताच्या सुमारास अनोळखी इसमांनी एका मोठ्या बैलाची कत्तल करून त्याचे मांस एका गाडीत भरून लंपास झालेले आहेत. सदरील घटना शेजारील कारखान्यात असणार्या विश्वास म्हात्रे नामक व्यक्तीने पाहिली. परंतु, अंधारत असल्याने काय चाललेय हे त्याच्या ध्यानात आले नाही. ज्यावेळी गायीचे बछडे उचलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विश्वास याने विरोध केला. परंतु, त्यावेळी त्या इसमांनी हत्यारे काढली. त्यामुळे तो काहीच करुन शकला नाही. दरम्यान, या कत्तल करणार्या अज्ञात चोरांचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करत आहेत. पेण पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले असल्याने गोधन चोरी करणारे लवकरच गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी दर्शविला आहे.