पनवेलच्या सराफा बाजाराला अक्षय झळाळी

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
| पनवेल | साहिल रेळेकर |

कोरोनापासून झालेली मुक्तता आणि त्यातच सोन्याच्या किंमतीत झालेली घसरणीने यामुळे मंगळवार ( दि.3 मे) अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पनवेलच्या सराफा बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर, नवीन पनवेल सह पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही सोन्या-चांदीच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे 2 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला सोन्याची मोठी विक्री होण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केलेली अपेक्षा पूर्णत्वास गेल्याची भावना सोने विक्रेत्यांनी व्यक्त केली. यंदा पारंपारिक सोने खरेदीसह ग्राहकांनी ऑनलाइन बाजारापेठेतही सोने खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. वैशाख महिन्यातील शुक्लपक्षात येणार्‍या या सणाचा मुहूर्त हिंदू आणि जैन धर्मियांसाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी बरेचजण शुभ कार्याची सुरुवात करतात. त्यामुळे सोनेखरेदीही केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.

पनवेलच्या बाजारपेठेला प्रथम पसंती
पनवेल शहराच्या 5 किलोमीटरच्या परिसरात साधारणपणे सोन्या चांदीची जवळपास 450 ते 500 लहान मोठी दुकाने आहेत. यामध्ये अंदाजे पनवेलमध्ये 125, कामोठ्यात 125, कळंबोलीत 50 ते 60, खांदा कॉलनीत 50 ते 60, नवीन पनवेलमध्ये 60 ते 70 तसेच वीचुंबे, देवद, सुकापूर, पाली, नेरे आदी ग्रामीण भागात 30 ते 40 दुकाने आहेत. आकर्षक डिझाइन्स, कमीत कमी मजुरीत, शुद्धतेची हमी या प्रमुख कारणांमुळे अलिबाग, पेण, कर्जत, खोपोली, खालापूर, नागोठणे, उरण परिसरातील असंख्य नागरिक पनवेलच्या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी येत असतात. अक्षय तृतीयेनिमित्त सकाळी ग्राहकांनी सोने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. दुपारी 12 ते 4 या दरम्यान प्रखर उन्हामुळे खरेदीचा वेग मंदावला होता. परंतु त्यानंतर सोने खरेदीचा बंपर वेग पाहायला मिळाला.

ग्राहकांसाठी विविध क्लुप्त्या
अक्षय तृतीयेला शास्त्रानुसार ग्राहक सर्वाधिक सोने खरेदी करतात. यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता सोने विक्रेत्यांनी अनेक क्लुप्त्या लढवल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विवीध डिस्काऊंट ऑफर्स, कमीत कमी मजुर, वेगवेगळ्या आकर्षक डिझाइन्स, इन्स्टॉलमेंट्स स्कीम्स अशा विविध शकला विक्रेत्यांनी राबविल्या होत्या. पुढील काही दिवसांत हजार ते दीड हजारांच्या आसपास सोन्याच्या किंमतीत घट अथवा वाढ होईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात असला तरीही अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत मंगळवारी सोने खरेदीसाठी ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

आजचे दर (प्रति तोळे)
1) सोने (हॉलमार्क 916)- 50,920/- अधिक 3% जीएसटी
2) सोने (हॉलमार्क 999)- 91,920 अधिक 3% जीएसटी
3) चांदी- 650

अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा सुवर्णयोग मानला जातो. आजच्या दिवशी पनवेलच्या सराफा बाजारात सोने खरेदीसाठी अपेक्षेप्रमाणे ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळाला. 2 वर्षांनंतर पूर्वीप्रमाणे सोने खरेदीला ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे.

राजेश बांठिया ( बांठिया ज्वेलर्स मालक)
Exit mobile version