कामगारांच्या डोक्यावरील ओझे होणार कमी

सिंधुदुर्गमधील विद्यार्थ्यांचे उपकरण; दप्तराप्रमाणे खांद्यावर अडकविता येणारे

। कुडाळ । वृत्तसंस्था ।

डोक्यावर विटा, वाळूची घमेली घेऊन जाणारे कामगार कायमच नजरेसमोर येतात. अशा कामगारांच्या डोक्यावरील ओझे हलके करण्याचा प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे. दप्तराप्रमाणे बेल्टच्या साहाय्याने खांद्यावर अडकविता येणारे हलक्या लाकडाच्या फळ्यांपासून विद्यार्थ्यांनी सहज ‘फोल्ड’ होणारे उपकरण विकसित केले आहे. त्यामुळे डोके आणि मानेवरील ओझे उतरणार असून कामगारांना काहीशी विश्रांती मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुळसुली (ता. कुडाळ) येथील लिंगेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता नववीतील लखन मेस्त्री आणि जतिन वेंगुर्लेकर यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. वजनाने अत्यंत हलक्या असणार्‍या प्लायवूडच्या फळ्यांचा वापर करून हे उपकरण केले आहे. ते खांद्यावर लावल्यास डोक्यावर एका छोट्या फळीचा आधार मिळतो आणि त्यावर घमेले किंवा वीटा यांसारखे वजन ठेवणे शक्य होते. परिणामी डोक्यावर ताण येत नाही, शिवाय त्याला बॅटरीच्या साहाय्याने दिव्याची सोय केल्याने अंधारातही त्याचा वापर करता येतो.

एवढेच नव्हे तर हे उपकरण ‘फोल्ड’ होत असल्याने काही वेळा बसण्यासाठी, आराम करण्यासाठी त्याचा यशस्वी वापर केला जाऊ शकतो.उपकरणाविषयी लखन म्हणाला, “अत्यंत कमी खर्चात हे उपकरण तयार करता येते. त्यामुळे कामगारांच्या डोक्यावरील ओझे उतरणार आहे. तसेच, कामगारांना काहीवेळ विश्रांती घेण्यासाठी बसण्याची व्यवस्थाही शक्य होणार आहे. आम्हाला आणखी काम करण्याची संधी मिळाल्यास या उपकरणाचे वजन आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’

लखन मेस्त्री आणि जतिन वेंगुर्लेकर यांनी आठवीमध्ये असताना, हे उपकरण तयार केले. सुरूवातीला हे उपकरण तालुका स्तरावरील प्रदर्शनात सादर केले. त्यावेळी या उपकरणाला पहिला क्रमांक मिळाला, त्यानंतर हे उपकरण जिल्हा स्पर्धेतही अव्वल ठरले. त्यानंतर राज्य स्तरावर उपकरणाच्या प्रकल्पाची निवड झाली. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 50 व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनात या प्रकल्पाची निवड केली.

विलास राठोड, शिक्षक, लिंगेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
(तुळसुली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)
कोणासाठी उपयुक्त ठरेल उपकरण?
वीटा उचलणारे कामगार
डोक्यावर भाजीपाला नेणारे
बांधकाम कामगार
डोक्यावर ओझे वाहून नेणार्‍या कोणत्याही प्रकारच्या कामगारांसाठी
    
उपकरणाचे फायदे
कमी श्रमात जास्त काम
डोक्यावरील आणि मानेवरील भार होतोय कमी
शरीराचा समतोल राहतो योग्य
रात्रीच्या वेळेही काम करणे शक्य
काम करून थकल्यानंतर बसण्यासाठी आसन व्यवस्था
उपकरण वाहतुकीस सोपे
दुपारी काम करताना डोक्यावर राहणार सावली
Exit mobile version