कळंबोली वसाहतीमधील हिंदू स्मशानभूमीतील प्रकार, नातेवाईकांचा संताप
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
‘विकसित शहर’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या कळंबोली वसाहतीमधील हिंदू स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी ‘मोबाईल टॉर्च’च्या उजेडात लहान बाळांचे दफनविधी करावे लागत असल्याने मृताचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 मध्ये असलेल्या गुरु संकल्प रहिवासी संस्थेतील रहिवासी असलेल्या मानसी म्हामुणकर या सात वर्षीय अल्पवयीन मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 25) घडली. पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास हिंदू रीतीरिवाजनुसार अंत्यविधी करण्यासाठी कळंबोली रोडपाली येथील हिंदू स्मशानभूमीत तिचा मृतदेह आणण्यात आला होता. मात्र, यावेळी हिंदू स्मशानभूमीत लहान बाळांसाठी असलेल्या दफनभूमीत वीज नसल्याने तसेच दफनभूमी परिसरात झाडेझुडपे वाढली असल्याने मोबाईलच्या उजेडात दफन विधी उरकण्याची वेळ मृताच्या नातेवाईकांवर आली. त्याचप्रमाणे स्मशानभूमी परिसरात पाण्याची सोय उपलब्ध नसून, दफन विधी करण्यासाठी आवश्यक खड्डा खोदण्यासाठी पुरेसे मनुषबळ उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांनाच खड्डा खोदावा लागत असल्याने पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
संबंधित समस्यांबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन अधिकऱ्यांनी दिले आहे.
-रवींद्र भगत,
माजी नगरसेवक
