। देवगड । वृत्तसंस्था ।
आचर्याहून देवगडला जाणार्या बसचे चाक मातीच्या ढिगार्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात चालक बापू लक्ष्मण काळे (वय 54, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात शनिवार दि.30 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी , आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव, प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (21) व मिताली प्रवीण मुणगेकर (19, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. चालक काळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घराची भिंत काही प्रमाणात कोसळून बस भिंतीला अडकून एका बाजूला कलंडली. बसमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह अन्य मिळून सुमारे 23 प्रवासी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याच बसमधून प्रवास करणारे पोयरे-गोंदापूर येथील लक्ष्मण दुखंडे यांनी सांगितले की, रस्त्याकडेला खणलेल्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगावर एसटीचे चाक गेल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला.





