। पनवेल। वार्ताहर ।
नवीन पनवेल-आदई सर्कल येथील राजीव गांधी मैदानातील फूटपाथवर अनधिकृत भाजीविक्रेत्यांसाठी एनएमएमटीचा बसथांबा काढून तो बाजूला उभारण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही या, काहीही करा अशी अवस्था मैदान आणि फूटपाथची झाली आहे. पनवेल महानगरपालिका आणि सिडको यापैकी इथे कोण कारवाई करणार, असा सवाल रहिवासी विचारत आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल-आदई सर्कल येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. मात्र, पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने ते सुस्तावले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. राजीव गांधी मैदानाच्या फुटपाथवर अनधिकृत चिकन, मटण विक्रेत्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून दुकाने उभारलेली आहेत. तर दुसरीकडे सायकल रिपेरींग, भाजी, फळ विक्रेत्यांनी जागा विकत घेतल्याप्रमाणे याच ठिकाणी पाय पसरले आहेत. येथे धंदे लावण्यासाठी पैसे मोजावे लागतात, असे एका विक्रेत्याने सांगितले. मात्र, हे पैसे कोणाच्या खिशात जातात, याचा खुलासा त्यांनी केला नाही. त्यामुळे या अतिक्रमणाकडे पनवेल पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याची चौकशी करून कारवाई करावी व येथील अतिक्रमण उद्ध्वस्त करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. याबाबत प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमणावर कारवाई करतो, असे सांगितले.