बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींचा व्यवसायावर परिणाम
| पनवेल | वार्ताहर |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच महिने आधीच मूर्तीकारांची लगबग सुरु होते. मात्र, बाजारात सध्या पनवेल शहराबाहेरुन तयार मूर्ती विक्रीसाठी येत असल्याने येथील स्थानिक मूर्तीकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडवत चालले आहेत. त्यामुळे पनवेलमधील स्थानिक मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
पनवेल शहरालादेखील गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे येथील स्थानिक मूर्तीकार चार ते पाच महिने आधीच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतात. पूर्वीपासून येथील स्थानिक मूर्तीकार मूर्ती बनवत आले आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून बाजारात तयार मूर्ती विक्रीसाठी येत आहेत. या मूर्ती पेण येथील कारखान्यात तयार होत असतात. या मूर्ती सहज उपलब्ध होत असल्याने पनवेल शहरात आज जागोजागी गणेशमूर्ती विक्री केंद्रे उभी राहात आहेत. मात्र, तयार मूर्ती विक्री केंद्रामुळे स्थानिक मूर्तीकारांना नवीन ग्राहक मिळत नसल्याने त्यांची मदार फक्त जुन्याच ग्राहकांवर अवलंबून असून, त्यातही आता घट होत चालली आहे. परिणामी, तयार मूर्तींमुळे पनवेल शहरातील स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने स्थानिक मूर्तीकार आज अखेरची घटका मोजत आहे.