| चिरनेर | प्रतिनिधी |
गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर कलानगरीत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे. गेणेशोत्सवाला अवघे 49 दिवस शिल्लक राहिले असून, सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, चिरनेर कला नगरीसह संपूर्ण उरण तालुक्यात बाहेरून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला असून, मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
उरण तालुक्यात खेड्यापाड्यात नव्याने गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. त्यामुळे नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याची खंत येथील मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. चिरनेर कलानगरीत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम आत्ता फार कमी झाले असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून त्यांना रंगकाम करून त्या ग्राहकांना विकल्या जातात. फार कमी कारखान्यातून शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या जात आहेत. गेल्या पाच पिढ्यांपासून आजपर्यंत 100 टक्के गणेश मूर्ती आमच्या कारखान्यात शाडू मातीच्याच घडविल्या जातात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती पसंत करणारे नवे जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन, दोन महिने आधीच गणेश मूर्ती बुकिंग करतात. ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो नुसार गणेश मूर्ती आम्ही साकारतो. परंतु, बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तीमुळे आमच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली आहे, असे मत मूर्तिकार चौलकर यांनी व्यक्त केले.