शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच

आ. संजय शिरसाट यांचा दावा

। औरंगाबाद । प्रतिनिधी ।

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सहा महिने पूर्ण होत असून, या सहा महिन्यात एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. त्यामुळे अनेकांनी मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंगही सुरू केली. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालाच नाही. पण आता राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं नक्की झालं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही ठरली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे. राज्यात आता मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागणार आहे. येत्या 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत तांत्रिक अडचणी दूर होतील. त्यानंतर 20 ते 22 तारखेच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असा अंदाज संजय शिरसाट यांनी वर्तवला आहे.

तसेच त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेवरही टीका केली. येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना रिकामी होणार आहे. शिवसेनेचे उरलेले आमदार 8 ते 10 दिवसात शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.

Exit mobile version