बुधवारी 24 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सभा बैठकांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर सोमवारी सायंकाळी साडेपाचनंतर प्रचारतोफा थंडावल्या आहेत. जिल्ह्यातील 24 लाखांहून अधिक मतदार बुधवारी (दि.20) मतदान करून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतमोजणी शनिवारी (दि.23) विधानसभा मतदान संघात होणार आहे. कोणाच्या पारड्यात किती मते पडणार, हे आठवड्यात समजणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे चित्र चार नोव्हेंबरला स्पष्ट झाले. 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप करीत वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी आपली बाजू मांडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रचार तोफा थंडावल्या आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत 24 लाख 88 हजार 788 मतदार असून, दोन हजार 790 केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55 हजार 893 मतदार, 85 वर्षांपुढील 35 हजार 863, दिव्यांग 13 हजार 191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत.