शेतकर्यांना पाण्याची प्रतीक्षा; पाटबंधारे विभागाचा नियोजनशून्य कारभार
| माणगाव | प्रतिनिधी |
काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी पंधरा डिसेंबरदरम्यान सोडले जाते. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. दरवर्षी प्रमाणे यंदाचेवर्षीही अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ त्याचबरोबर शेवाळ व झाडे, झुडपे वाढली असून, या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने सुरु केली नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शेतकर्यांनी रब्बी हंगामातील भातपीक घेण्यासाठी मशागतीची कामे हाती घेतली आहेत. पाटबंधारे विभागाला मात्र कालवा सफाई व दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळेना. त्यामुळे शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे.
माणगाव तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पंधरा डिसेंबरला कालव्याला पाणी सुटेल या डेडलाईनकडे शेतकर्याचे डोळे लागले असून, कालवा सफाईची कामे कधी सुरु होणार हा प्रश्नच शेतकर्यापुढे उभा आहे. यांत्रिक विभागाकडून मशीनरी उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम जलद गतीने सुरु केले जाईल, अशी माहिती माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांनी प्रतिनिधींकडे बोलताना दिली.
कडधान्य पेरलेल्या शेतात पाणी गेल्यानंतर नुकसान होते. त्यामुळे कडधान्य पिकवणारे शेतकरी पाणी सोडण्यास नकार देतात. तर भातपीक घेणारे शेतकरी पाण्याची मागणी करतात. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत यावर्षीही पेच पाटबंधारे विभागापुढे उभारणार आहे. सन 2018 मध्ये चार हजार नवशे त्रेपन हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते. यंदाचे वर्षी माणगाव शाखेवर 79.32 हेक्टर जमिनीवर तर मोर्बा शाखा 61.23 हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. गोरेगाव शाखा कालवा गेल्या वर्षी लिकेजमुळे बंद होता. यंदाचे वर्षी लोकांची मागणी व पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले असून, उसरघर पर्यत 5 कि.मी अंतरापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचीवाडी ते माणगाव हे 30 कि.मी अंतर आहे.
पाण्याची विभागणी
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे. बंधार्यातील पाण्याची विभागणी करण्यात आली. औद्योगिक वापरासाठी सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर, पिण्यासाठी 7.65, सिंचनासाठी 156.42 दशलक्ष घनमीटर इतकी तरतूद करण्यात आली आहे. भिरा येथील टाटा जलविधुत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणार्या 664.694 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी 103 दशलक्ष घनमीटर पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो.
बंधार्यावर डावा आणि उजवा कालवा आहे. माणगाव तालुक्यातील शेतीला डाव्या कालव्यातील पाणी सोडण्यात येते. उजव्या कालव्यातून रोहा तालुक्यातील शेतीला पाणी सोडण्यात येते. दोन्ही तालुक्यांतील सुमारे सात हजार नऊशे छत्तीस हेक्टर जमीन ओलिताखाली येते. हे पाणी दरवर्षी पंधरा डिसेंबर ते पंधरा एप्रिल या कालावधीत सोडण्यात येते. 4953 हेक्टर सिंचनापैकी गेल्यावर्षी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते.