मतदारांच्या मोबाईल स्क्रीनवर राज्य करण्याचा प्रयत्न
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका निवडणुकीत पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड देऊन प्रचार करण्याला पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्राधान्य देत आहेत. व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवण्याजोगी रिल्स बनवून प्रचार करण्याला सध्या सर्वच राजकीय तसेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार देत आहेत. यामुळे इन्स्टाग्रामवरील गाजलेल्या गाण्यांवर किंवा संवादांवर उमेदवार आपले प्रचाराचे मुद्दे गुंफत आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या रील-प्रचारामुळे मतदारांच्या पसंतीवर किती परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
एंट्री व्हिडिओ: उमेदवाराची प्रभागात एन्ट्री होताना मागे स्लो-मोशन संगीत आणि समर्थकांची गर्दी असलेले सिनेमॅटिक व्हिडिओ तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. तसेच मिम्सचा वापर करून विरोधकांच्या विधानांवर मिश्किल भाषेत उत्तर देण्यासाठी प्रभावी वापर केला जातोय. पालिका निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे उमेदवार आपल्या प्रभागातील रस्ते, कचरा समस्या किंवा पाणीप्रश्नावर ऑन द स्पॉट रील बनवून आपण किती सक्रिय आहोत, हे दाखवत आहेत.
प्रभागातील प्रश्न : तुंबलेली गटारे किंवा खराब रस्त्यांजवळ उभं राहून “बघा ही स्थिती, मी बदलणार!” अशा आशयाचे व्हिडिओ.
मतदारांशी संवाद : वस्तीत किंवा चाळीत जाऊन लोकांसोबत संवाद साधतानाचे भावनिक व्हिडिओ बनवून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवार प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना आपल्या प्रचारात सामील करून घेण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, अनेक उमेदवारांनी केवळ रील बनवण्यासाठी विशेष सोशल मीडिया मॅनेजर्स आणि व्हिडिओ एडिटर यांची टीम आपल्या ताफ्यात तैनात केली आहे.
आयोगाची डिजिटल हालचालींवर नजर
खर्चाचे गणित : रीलच्या शूटिंगसाठी होणारा खर्च, पेड प्रमोशन आणि इन्फ्लुएन्सरला दिलेले पैसे हे आता उमेदवाराच्या अधिकृत निवडणूक खर्चात समाविष्ट केले जात आहेत.
आचारसंहिता : चिथावणीखोर किंवा खोटे दावे करणाऱ्या रीलवर आचारसंहितेनुसार कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.






