एक गंभीर, तिघांना किरकोळ दुखापत
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड तालुक्यातील चांढवे बुद्रुक येथे हुंडाई कार कंटेनरला मागून धडकल्याने अपघात झाला. अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तातडीचे उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. या अपघातामध्ये हुंडेई कारमधील एका प्रवाशाला गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत.
हुंडाई वेन्यू कार क्रमांक (एमएच 04 एलएच 338) चे चालक राजाराम दत्तू कडू (वय 40,रा.बदलापूर, जि. ठाणे) व सहप्रवासी निलेश हरिभाऊ शेलार (वय 31,रा.टिटवाळा, जि. ठाणे), राजकुमार गुलजारराम मल्ही (वय 57, रा.कल्याण, जि. ठाणे), प्रमोद महादेव खंडागळे (वय 37, रा.माढा जि.सोलापूर) असे चौघेजण सावंतवाडी ते मुंबई महामार्गावरून प्रवास करताना कार चांढवे बुद्रुक पुलावर आली असता समोरील कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हुंडाई कारची कंटेनरला मागून ठोकर लागून अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक न थांबता त्याने पलायन केले आहे.
अपघातात हुंडाई वेन्यू कारचे नुकसान झाले असून, कारमधील राजकुमार गुलजारराम मल्ही यास डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर अन्य तिघांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली.