राज्यकर्त्यांच्या आश्वासनाच्या मुदती संपल्या; 14 वर्षानंतरही महामार्गाचे काम अपूर्ण
। माणगाव। वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 14 वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरू आहे. राज्यातील महत्वाचा विदर्भातील समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण झाले. मात्र, कोकणच्या विकासाचा मुंबई-गोवा महामार्ग वर्षोनुवर्षे रखडला असल्याने कोकणवासीयांचे दुखणे कायम राहिले आहे. सरकारने अनेक वेळा महामार्गाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली होती. ती आश्वासने हवेतच विरली. त्यामुळे आजही कोकणच्या समृद्धीचा मार्ग खडतरच राहिला. याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे लहान-मोठे अपघात तसेच या अपघातांतून अनेकांचे जाणारे जीव व अनेकांना आलेले कायमचे अपंगत्व पाहता हा महामार्ग जणू काही मृत्यूचा सापळाच बनला होता. गेल्या 14 वर्षांपूर्वी पळस्पे ते इंदापूर या जवळपास 90 किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. त्यानंतर इंदापूरपासून पुढे दुसर्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गाचे काम गेली 14 वर्ष रखडले असून पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे कामही अजून व्यवस्थित पूर्ण झालेले नाही. इंदापूरपासून पुढे असणार्या दुसर्या टप्प्यातील माणगावचा बायपासचा प्रश्नही खितपत पडला आहे. बायपासच्या कामाची रखडपट्टी यामुळे माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या 10 किमीपर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. सुट्टीच्या व सणाच्या दिवसात कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या गाड्या तसेच, सणानिमित्त गावाकडे कोकणात चाकरमानी वाहनांनी येतात.
माणगाव शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बाजारपेठेतून बाहेर पडताना त्यांच्या नाकी नऊ येतात. महामार्गावर काम करताना केलेली लेन कटिंग बर्याच वेळा जीवघेणी ठरते. अशीच एक लेन कटिंग काही महिन्यांपूर्वी एका कार चालकाच्या रात्रीच्या वेळेस लक्षात न आल्याने माणगाव जवळील रेपोली गावच्या हद्दीत त्या कारला अपघात होऊन कारमधील सर्व 10 जण मृत्यूमुखी पडले होते. यांसारखे अनेक भीषण अपघात महामार्गावर होत असतानाही लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते या महामार्गाच्या कामाकडे गंभीर्याने पाहताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसह अनेक संस्था-संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. तरीही या महामार्गाचे काम 14 वर्ष रखडले आहे. कोकणातील जनता हि संयमी असल्याने याचाच फायदा राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी घेत आहेत. आता या प्रश्नाबाबत कोकणी माणसाचा संयम सुटू लागला आहे. राज्यकर्ते या महामार्गावरून सातत्याने जात असतात. परंतु, या प्रश्नाकडे ते गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. या महामार्गाच्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन तो महामार्ग होऊन सुरूही झाला आहे. मग 14 वर्ष उलटूनही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजून पूर्ण का होत नाही, असा सवाल जनतेतून होत आहे.