अरेच्चा! पोलिसालाच घातला 32 लाखांचा गंडा

| पनवेल | प्रतिनिधी |
सीवुडस्‌‍‍ भागात राहणाऱ्या व्यक्तीने नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदारासोबत सदनिका विक्रीचा व्यवहार केला. त्यांच्याकडून 32 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांना सदनिका न देता परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अरुण सालियन (53) असे या व्यक्तीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार पोलीस हवालदार सीवुडस, सेक्टर-48 मध्ये राहण्यास असून ते नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची फसवणूक करणारा सीवुडस, सेक्टर 50 मध्ये राहण्यास आहे. 2018 मध्ये सालियनने सीवुडस, सेक्टर- 42 मधील इव्ही रेसीडेन्सी इमारतीतील त्याच्या मालकीची सदनिका विक्रीसाठी काढली होती. त्यावेळी पोलिसाने सदरची सदनिका विकत घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांच्यात सदनिकेच्या खरेदीविक्रीचा 63 लाख रुपयांचा व्यवहार ठरला. त्यानुसार त्यांनी करार देखील बनवून घेतला. पोलिसाने प्रथम 5 लाख रुपये रोख आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने असे एकूण 32 लाख 50 हजार रुपये सालियनला दिले.

पोलिसाने सदनिकेची नोंदणी करण्यासाठी सालियनकडे कागदपत्रांची मागणी केली. त्याने कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली. त्याने पोलिसाचे फोन घेणे देखील बंद केले. त्यामुळे या पोलिसाने सीवुड्समधील इव्ही रेसीडेन्सी इमारतीतील त्याचे घर गाठले असता, सालियनने सदरची सदनिका दुसऱ्याच महिलेला विकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसाने सालियनकडे आपले पैसे परत मागितले असता, त्याने दोन महिन्यात 30 लाख रुपये देण्याचे कबूल करुन 10 लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. मात्र, धनादेश बँकेमध्ये वटले नाहीत.

मार्च 2023 मध्ये सालियन आणि पोलीस यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारानुसार सालियनने पोलिसाच्या पत्नीच्या नावे 20 लाख रुपये देण्याचे मान्य करुन त्यांना धनादेश दिला. मात्र, तो धनादेश देखील वटला नाही. अखेर पोलिसाने एनआरआय पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Exit mobile version