सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता

विजय मांजरेकर-रमाकांत देसाई चषक उत्साहात

| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |

क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने अंतिम सामन्यात इस्लाम जिमखान्याचा पराभव करत विजय मांजरेकर-रमाकांत देसाई टि-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेचे आयोजन दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे करण्यात आले होते.

इस्लाम जिमखान्याच कर्णधार विनायक भोईरने नाणेफेक जिंकून क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला प्रथम फलंदाजी दिली. या स्पर्धेत सातत्याने कामगिरी करत असलेल्या सीसीआयच्या अखिल हेरवाडकर आणि कर्णधार आकाश आनंद या सलामीवीरानी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांनी इस्लाम जिमखान्याच्या गोलंदाजांवर हुकम गाजवत पहिल्या बळीसाठी 79 धावांची भागीदारी केली. त्यांनतर अखिल हेरवाडकर 39 धावा करून बाद झाला. लगेचच आकाश आनंदही 47 धावा करून परतला. त्यानंतर संघ अडचणीत असताना डावखुरा फलंदाज ध्रुमील मटकरने 47 धावा फटकावत संघाची धावसंख्या वाढवली. त्याने सौरभ सिंगसह पाचव्या बळीसाठी 45 धावांची भागीदारी केल्यामुळे सीसीआयने 20 षटकांत 7 गडी गमावत 197 धावा केल्या. इस्लाम जिमखान्यातर्फे अंकुर सिंग, मुबश्शीर शेखने आणि विनायक भोईर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यांनतर सीसीआयने दिलेले विजयाचे आव्हान इस्लाम जिमखान्याला पेलवले नाही. सीसीआयचा सलामीचा फलंदाज भूवन पाटील या एकट्याने सर्वोच्च 35 धावा ठोकल्या. इतर फलंदाजांनी बद्रे आलम आणि इर्फान उमेरच्या भेदक गोलंदाजीसमोर नांगी टाकली. त्यामुळे त्यांचा डाव 18.4 षटकांत 166 धावांतच आटोपला.

या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज अखिल हेरवाडकर, सर्वोत्तम गोलंदाज विनायक भोईर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा पुरस्कार आकाश आनंदला मिळाला. तर, अंतिम सामान्यातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू बद्रे आलम हा ठरला. यावेळी विजेत्या सीसीआय संघाला आकर्षक चषकासह 1 लाख रुपयांचा आणि उपविजेत्या इ्‌‍स्लाम जिमखान्याला चषकासह 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी कसोटीपटू संदीप पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी शिवाजी पार्क जिमखान्याचे माजी कसोटी पंच माधव गोठोस्कर आणि माजी कसोटीपटू चंदू पाटणकर यांना संदीप पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

Exit mobile version