स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
| सुकेळी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत हद्दीतील सिध्देश्वर (खुर्द) येथील स्मशानभूमीची अवस्था बिकट आहे. स्मशानभूमी फक्त नावापुरतीच आहे. पत्राशेडचा अभाव तसेच लाकडे ठेवण्यासाठी लोखंडी खांब नसल्याने दगडांचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
वारंवार लक्ष वेधण्यात येऊनही या स्मशानभूमीचे काम करण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. मृतदेह दहन करण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या लाकडांसाठी ज्या लोखंडी खाबांचा आधार असतो, ते या ठिकाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला दगडींचा वापर करून त्यावर लाकडे रचून मृतदेह जाळण्यात येत आहेत. त्याचबरोबर अंत्ययात्रेबरोबर येणाऱ्यांसाठी निवारा शेडही नसल्यामुळे ऊन किंवा पावसात विधी उरकतांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर अंत्यविधीसाठी आणण्यात येणाऱ्या मृतदेहावर तर प्लास्टिकचे आवरण करुन पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागत आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.