मुदतीमध्ये काम करण्यास आ. दळवी अपयशी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील ताड व साखरमधील स्मशानभूमी निवारा शेड बांधण्याचा गाजावाजा आमदार दळवींनी केला. प्रत्यक्षात मात्र ते काम पूर्ण करण्यास दळवी अपयशी ठरले आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्याची पूर्तता करण्यास ते कमी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. आक्षीतील स्मशानभूमी निवारा शेड गायब झाली आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.
कोट्यवधी रुपयांचा विकास या मतदारसंघात केल्याच्या बतावण्या आमदार दळवी यांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणातून केल्या आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आक्षीमधील दोन स्मशानभूमींच्या निवारा शेडचे काम ते पाच वर्षांत पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे आमदारांच्या विकासकामांबाबत आक्षीमध्ये अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील ताड आणि साखर येथील स्मशानभूमी निवारा शेडच्या कामांसाठी 2022-23 मध्ये प्रत्येकी पाच-पाच लाख रुपये मंजूर झाले. 31 मार्च 2024 पर्यंत ही कामे आमदारांच्या ठेकेदाराने पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराकडून स्मशानभूमीच्या निवारा शेडचे कामच पूर्ण झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या ठेकेदारांनी पाच वर्षांपर्यंत फक्त त्याठिकाणी खडी टाकून ठेवली आहे. प्रत्यक्षात साधी वीटही लावली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
पाच वर्षांत निवारा शेडचे काम झाले नसल्याने या कामांबाबत शंका निर्माण होत आहे. कामे न करता बिल ठेकेदाराने काढले नाही, ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. सत्तेचा वापर करीत हा प्रकार घडल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.