केंद्राने रद्द कायद्यांची स्पष्टता द्यावी

आ. जयंत पाटील यांची किसानमोर्चाच्या वतीने मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।

आज सकाळी केंद्र सरकारने कृषीविषयक तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रद्द झालेल्या कृषी कयद्यांविषयीची स्पष्टता अजुनही झालेली नाही. प्रामुख्याने किसान मोर्चामार्फत मागण्यात आलेल्या मागण्यांची संपुर्ण स्पष्टता मिळत नाही, तोपर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचे किसान मोर्चाच्या माध्यमातुन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय किसान मोर्चाने योग्य भुमिका घेतली. गेल्या 16 महिने तिथले तमाम शेतकरी रस्त्यावर उतरून एकजुटीने आंदोलन करत होते. शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होते. परंतु हा निर्णय केंद्राने या आधीच घेतला असता तर 250 शेतकर्‍यांचे जे रक्त सांडले, जी जिवीतहानी झाली, ती झाली नसती, असे प्रतिपादन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आ. जयंत पाटील यांनी केले.
आ. जयंत पाटील यांनी दिल्लीमधील वरीष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे हे विधेयक मंजूर होत नाही व मागण्यांची संपुर्ण पुर्तता होत नाही; तोपर्यंत हे आंदोलन चालु राहील. ज्या शतकर्‍यांचे रक्त सांडले आहे, त्यांच्यामुळेच हे कायदे मंजुर झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
देशातील हे पहीले दिर्घकाळ चालणारे व यशस्वी झालेले आंदोलन आहे. केंद्राने हा निर्णय यापुर्वीच घेतला असता तर इथल्या व्यापार्‍यांचे नुकसान झाले नसते. आता कायदे रद्द करताना जे नवीन कायदे करायला पाहीजेत, त्याबाबत सुतोवाचक केंद्राने स्पष्ट केले पाहीजे, अशी मागणी किसान मोर्चाच्या व शेकापच्यावतीने आ. जयंत पाटील यांनी मांडली.हे आंदोलन विविध किसान सभेच्या माध्यमातुन झाले. त्यात प्रामुख्याने पंजाब, हरीयाणा व उत्तर प्रदेशमधील शेतकर्‍यांचा मोठा वाटा व योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हे आंदोलन ज्याप्रकारे शांततेने हाताळले व यशस्वी केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जे हुतात्मे झाले, त्यांचे अस्थिकलश 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया येथे आणण्यात येणार आहेत. तमाम शेतकर्‍यांच्या उपस्थितीत त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी शेकाप व विविध संघटनांमार्फत व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

संघर्षाचा विजय
ही ऐतिहासिक लढाई शेतकर्‍यांमार्फत यशस्वी जिंकल्याची भुमिका आज दिसत असली तरी जोपर्यंत केंद्र या विषयाबाबत सुस्पष्टता देत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. त्यामुळे रद्द झालेल्या कायद्यासंबधी योग्यती स्पष्टता सरकारने लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी किसानमोर्चाच्या माध्यमातुन आ. जयंत पाटील यांनी केली. संघर्षाचा अखेर विजय झाला. असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version