ठाणेसह मुंबईतील रुग्णालयात होणार तपासणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयासह मुंबई येथील जेजे रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. ठाणे येथील उपसंचालक कार्यालयात 67 जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कर्मचारी बदल्या, पदोन्नती तसेच इतर सरकारी लाभ मिळवण्यासाठी काही शासकीय कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. बोगस प्रमाणपत्रांचा गैरवापर करून काही कर्मचाऱ्यांनी बदल्या घेतल्या, आहेत.पदोन्नती मिळवली असून इतर सरकारी लाभ घेतले असल्याचे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आले आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी शासनाने प्रमाणपत्र फेर पडताळणी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ओळखपत्र सादर करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चारशेहून अधिक दिव्यांग कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागासह महसूल, एसटी महामंडळ, सहकार, आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागात हे कर्मचारी काम करीत आहेत.त्यामुळे आता या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेकडून त्याची कार्यवाही सुरू केली आहे. 67 जणांची पडताळणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात होणार आहे. त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
