मतदानाचा टक्का राखण्याचे आव्हान

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उन्हाळ्याच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मतदारांनी सुट्ट्यांचे नियोजन सुरु केले आहे. एसटी, खासगी बस, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनाने रायगडकर भटकंतीला निघाले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राखण्याचे मोठे आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे. यासोबत हक्काच्या मतदारांना मतदानासाठी रायगडात आणण्याचे शिवधनुष्य राजकीय पक्षांना पेलावे लागणार आहे.

राज्यभरात तापमानाचा पारा वाढल्याने आधीच पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का घटला आहे. रायगड जिल्ह्यातही वाढत्या तापमानामुळे हाच ट्रेन्ड कायम राहिल्यास मतदानाची टक्केवारी घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यातच सुट्ट्यांमुळे होत असलेल्या तात्पुरत्या स्थलांतरामुळे त्यात अधिकची भर पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासोबत राजकीय पक्षही चिंतेत असून मतदानाचा टक्का वाढवण्याऐवजी पूर्वीची टक्केवारी राखण्याचे मोठे आव्हान दोघांपुढेही असणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 64.73 टक्के आणि 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी घसरून 61.77 टक्के एवढी कमी झाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख 63 हजार 356 पुरुष तर 2 लाख 76 हजार 121 महिला मतदारांनी मतदान करण्यासाठी पाठ फिरवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 4 हजार 368 पुरुष आणि 3 लाख 27 हजार 4 महिला मतदारांनी मतदान केले नाही.

रायगड लोकसभा मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पेण , अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड तर रत्नागिरी जिल्झ्यातील गुहागर आणि दापोली असे एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यानुसार रायगड लोकसभेसाठी 16 लाख 68 हजार 372 मतदार आहेत. यामध्ये आठ लाख 20 हजार 605 पुरुष, आठ लाख 47 हजार 763 महिला आणि 4 थर्ड जेंडर मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मराठी मतदारांबरोबरच देशातील विविध प्रांतातील मतदारदेखील आहेत. सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने अनेकांनी आपल्या कुटुंबासह गावचा रस्ता धरला आहे. त्यामुळे यंदा रायगड लोकसभेसाठी किती टक्के मतदान होणार, अशी चिंता निवडणूक अधिकार्‍यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. मतदानाचा टक्का वाढवणे सोडा, 2019 च्या निवडणुकीत झाले होते, तेवढी टक्केवारी राखता यावी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांची धडपड सुरू आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी प्रवाशांकडून सर्रासपणे एसटीला पसंती दिली जात आहे. महिलांना एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत असल्याने गाड्यांमध्ये बहुतांशी महिला प्रवासी असल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाकडून दररोज मुंबई सेंट्रल, परळ, दादर, कुर्ला नेहरूनगर, बोरिवली, कल्याण , ठाणे , पुणे, औरंगाबाद , शिर्डी येथे जाण्यासाठी गाड्या सोडल्या जात आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवार, सात मे रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदान करता यावे, म्हणून सरकारी कार्यालयांबरोबर अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी-रविवारची हक्काची वीकेंडची सुट्टी आहे. त्यानंतर मंगळवारी मतदानाची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सोमवारी एक दिवसाची दांडी अथवा सुट्टी घेण्याच्या तयारीत अनेक कर्मचारी दिसत आहेत. त्याचाही रायगड लोकसभा मतदानावर परिणाम होऊ शकणार आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे रायगडात वास्तव्याला असलेल्या अनेक मजुरांनी उन्हाळी सुट्टी आणि निवडणुकीचा मुहूर्त साधत गावी पलायन केले आहे. त्याचबरोबर पश्‍चिम बंगाल ओडिशाला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मध्य आणि पश्‍चिम रेल्वेकडून नियमित गाड्यांबरोबरच 15 मार्चपासून उन्हाळी स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. आतापर्यंत रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या माध्यमातून कामगारांनी घर गाठले आहे.
जिल्हा निवडणूक विभागाचे प्रयत्न
 गावागावांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सच्या माध्यमातून जनजागृती
 सामाजिक संस्थां, विद्यार्थी, कलाकारांकाराच्या मदतीने मोहिमा
 पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन
 दुचाकी , सायंकाळच्या माध्यमातून जनजागृती
 शहरात होर्डिंग्ज, सेलिब्रिटींसोबत मतदानासाठी पत्रव्यवहार
 सोशल मीडियावर मतदानाबद्दल जनजागृती
Exit mobile version