सावित्री पुलावरील चॅनेल तुटले

स्ट्रक्चरल ऑडीटशिवाय पुलाचे लोकार्पण

| पोलादपूर । वार्ताहर ।

पोलादपूर ते महाडदरम्यानचा ब्रिटीशकालीन पुल कोसळून अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाल्यानंतर अल्पावधीतच बांधून स्ट्रक्चरल ऑडीटशिवाय लोकार्पण करण्यात आले. नवीन सावित्री पुलावरील लोखंडी चॅनेल तुटल्याने या पुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड येथील अभियंत्यांना याबाबत कोणतेही गांभिर्य वाटत नसले तरी अचानक कोणत्याही प्रकारे या पुलाला हानी पोहोचल्यास पुलावरील किती वाहनांना हानी पोहोचेल, अशी धास्ती प्रवासी व वाहतूक करणार्‍यांकडून व्यक्त होत आहे.

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे काम पुर्णत्वास गेलेले दिसू लागले आणि या कामाच्या लोकार्पणाची लगबग सुरू झाली होती. यासंदर्भात स्ट्रक्चरल ऑडीट न करताच नवीन पुलाचे लोकार्पण होणार असल्याच्या बातम्यांवर नवीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करायचे नसते, असे बोलले जात होते. त्यामुळे केवळ 165 दिवसांमध्ये सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल कोसळलेल्या ठिकाणी हा नवीन पुल उभारून त्याचे लोकार्पण 5 जून 2017 रोजी करण्यात आले होते. लोकार्पणानंतर केवळ पाचच वर्षांत मंगळवारी सकाळी पहिल्या नवीन सावित्री पुलावरील लोखंडी चॅनल तुटल्याने संपूर्ण पुलाला हादरे आणि तीव्र स्वरूपाची कंपनं जाणवू लागल्याने पुलावरून महाडकडे जाणार्‍या वाहनांसह वाहनचालकांना या पुलाचा धोका वाटू लागला आहे.

Exit mobile version