ऐतिहासिक क्षण! सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना आज शपथ दिली. पहिल्यांदाच इतका मोठा शपथविधी सोहळा पार पडला. या 9 न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. हा शपथ सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनवी रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. सामान्यत: न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्‍वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी शपथ घेतली.

मंगळवारी नऊ न्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या 33 झाली आहे. तर स्वीकृत संख्या 34 असल्याने अजूनही एक जागा रिक्त असणार आहे. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीत 9 नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी दिली होती. 2019 नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. 17 नोव्हेंबर 2019 रोजी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यापासून नियुक्त्या रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नऊ नावांची शिफारस 22 महिन्यांनंतर पाठवली होती.

दुसरीकडे न्यायाधीश नागरत्ना या सप्टेंबर 2027 मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळाल्यास 2027 मध्ये देशाच्या पहिली महिला सरन्यायाधीश बनू शकतात. जस्टीस नागरत्ना या माजी सरन्यायाधीश ई एस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत. न्यायमूर्ती नागरत्न व्यतिरिक्त, पाच सदस्यीय कॉलेजियमने निवडलेल्या इतर दोन महिला न्यायाधीशांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.

दरम्यान पी एस नरसिम्हा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. पी एस नरसिम्हा थेट बारमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत. 1993 मध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम प्रणाली अस्तित्वात आल्यापासून नरसिम्हा बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात येणारे सहावे वकील बनले आहेत.

Exit mobile version