मुख्यमंत्र्यांच्या फलकाला काळे फसले

शिंदे समर्थकांची तक्रार
| पनवेल | प्रतिनिधी |

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिवसेना फलकावरील छायाचित्रांवर शिवसैनिकांनी काळे फासल्याप्रकरणी शिंदे समर्थकांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून पनवेलमधील रामदास शेवाळे, मंगेश रानवडे आणि प्रथमेश सोमण यांच्यासह निवडक काहीजणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठा व्यक्त केली आहे. शिंदे यांच्या गटात पनवेलमध्ये अनेकजण जात असल्याचे पाहून कामोठे वसाहतीमधील शिवसैनिकांनी कामोठे येथील शिवसेनेच्या एका फलकावरील शिंदे यांच्या छायाचित्रावर बुधवारी रात्री काळे फासून घोषणाबाजी केली. शिंदे यांच्यासह खासदार बारणे यांच्याही फोटोला काळे फासण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा चेहरा विद्रूप करण्याचा सर्व प्रकाराचे छायाचित्रण करून संबंधित शिवसैनिकांनी ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले.

पनवेलमध्ये चर्चा झाल्यानंतर शिंदे यांचे पनवेलमधील समर्थक शेवाळे यांच्यासह सूमारे 25 समर्थकांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर पोलीस अधिकारी जाधव यांनी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version