जिल्हा रुग्णालयात 14 खाटांचा कक्ष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कमी वजनाच्या व नाजूक बाळांना आता नवसंजीवनी मिळणार आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात माता नवजात शिशु देखभाल कक्षामार्फत त्यांची निगा राखली जाणार आहे. वाढती गरोदर माता (प्रसूतीचे प्रमाण) व वाढता ताण लक्षात घेऊन माता नवजात शिशु देखभाल कक्ष सुरु करण्यात आला. त्यामुळे वजनाने कमी असलेल्या बालकाची आता भीती बाळगण्याची गरज नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
आईच्या कुशीत बाळाला मिळालेले प्रेम व आईच्या मांडीवर बाळाचे संगोपन या जीवनसूत्राचा विचार मनात ठेवून अलिबाग जिल्हा रुग्णालयात या कक्षाच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवला गेला. राष्ट्रीय आरोग्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एक अनोखे पाऊल टाकण्यात आले. माता बालसंगोपन या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात माता नवजात शिशु देखभाल कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे कमी वजनाच्या व नाजूक बाळांना त्याच्या आईच्याच सहवासात ठेवून त्याची चांगल्या प्रकारे निगा राखणे आता सहज शक्य होणार आहे. एकूण 14 खाटांची सुरुवात करण्यात आली आहे. या कक्षात असणार्या प्रत्येक मातेला व बालकाला लागणारी उपकरणे, कपडे व साधने यांनी हा कक्ष सुसज्ज केला आहे. या कक्षाची देखभाल व्यवस्थितरित्या व्हावी, याकरिता लागणार्या परिचारिका, डॉक्टर यांचे पथक नियोजित करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते तसेच डॉ. सागर खेदू, परिचारिका, कर्मचारी यांच्या निदर्शनाखाली या नवीन कक्षाची स्थापना केली. भविष्यात कमी वजनाच्या व नाजूक बाळांचे संगोपन आधुनिक पद्धतीने करण्याबरोबरच घरच्या वातावरणात कसे मातेकडून माता नवजात शिशु देखभाल कक्ष करवून घेता येईल याचे प्रशिक्षण मातेला व तिच्या नातेवाईकांना दिले जात आहे.