किहीममध्ये किलबिलाटाला मिळणार आता अभ्यासाची जोड

डॉ. सलिम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राचे भूमीपूजन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील किहीम येथील कर्मभुमीत जून्या जिल्हा परिषद शाळेमध्ये देशाचे आद्य पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांचे नावाचे पक्षी अभ्यास व एन्व्हॉरमेंट एज्यूकेशन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषद व वन विभाग रायगड यांच्या यामाध्यमातून पर्यटन वाढीला अधिक चालना देणे, वेगवेगळ्या पक्षांची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजन रायगडच्या पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता पारधी, जिल्हा परिषदेचे गटनेते अ‍ॅड. आस्वाद पाटील, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील , अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, सदस्य समिहा पाटील, अलिबागचे वन परिक्षेत्र अधिकारी विकास तरसे, किहिमच्या सरपंच सीमा थळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किहीम या ठिकाणी डॉ . सलीम अली यांच्या नावाचे पक्षी अभ्यास केंद्र उभारले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सहकार्य मिळाले. त्यामुळे या ठिकाणी ही वास्तू उभारण्याची संधी मिळाली आहे. सलीम अली यांचे योगदान सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. आणखी पर्यटनाच्या माध्यमातून वेगळी वास्तू उभारण्याचा तसेच डॉ सलीम अली यांची आठवण कायम राहण्यासाठी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे . यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल. शाळेतील मुलांना सहलीसाठी हे केंद्र उपयोगी ठरणार आहे. जिल्हा नियोजन मधून 55 लाख व प्रादेशिक पर्यटनातून एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला जात आहे. असेही आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रास्तविक उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार यांनी केले.

पक्षी शास्त्रज्ञ सलीम अली यांच्या नावाचे पक्षी व एन्व्हॉरमेंट एज्युकेशन सेंटर असणार आहे. या सेंटरमध्ये सलीम अली यांच्याविषयी माहिती असणारे केंद्र बांधले जाणार आहे. सलीम अली यांनी पक्षाविषयी लिहीलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय असणार आहे. देशातील वेगवेगळ्या जातीच्या तसेच कोकणातील वेगवेगळ्या पक्षांची माहिती पर्यटक व स्थानिकांना मिळावी. यासाठी डिजीटल माहिती केंद्र उभारले जाणार आहे. तसेच पक्षांविषयी असलेली वेगवेगळे पुस्तकांसाठी विक्री केंद्र असणार आहे. हे सर्व केंद्र डिजीटल स्वरुपाचे असून अद्ययावत असे केंद्र बांधले जाणार आहे.

सलीम अली यांनी अलिबाग तालुक्यांतील किहीम या ठिकाणी मुक्कामी असताना, सुगरण पक्षाच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यावर त्यांनी बीएनएचएस च्या जर्नलमध्ये प्रदिर्घ शोध निबंध लिहीला होता. हा निबंध त्यांना पक्षी शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास जबाबदार ठरला. किहीम या वास्तव्याच्या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांच्या नावाचे पक्षी सेंटर व एनव्हॉरमेंट एज्युकेशन सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषद व वन विभाग यांच्यामार्फत करण्यात आला आहे. पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
किहीम गावातील जिल्हा परिषदेची शाळा 2007 पासून बंद आहे. या शाळेच्या दोन इमारती असून सात वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी तीन वर्ग खोल्या सुस्थितीत असून चार वर्ग खोल्या नादुरुस्त आहे. या शाळेत संरक्षण भिंत नाही. या शाळेची जागा अंदाजे 30 गुंठे क्षेत्रामध्ये आहे. या ठिकाणी हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

Exit mobile version