सिडको प्रशासन नरमले

पूलप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन; बैठकीचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

बोकडविरा सिडको कार्यालयाजवळील पूल नादुरुस्त झाल्याने गेली तीन वर्षांपासून एसटी बस बंद करण्यात आली आहे. त्याचा नाहक भुर्दंड बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पाणजे येथील जनतेला सहन करावा लागत होता. त्याच्या निषेधार्थ जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले होते. सिडकोला नमते घेऊन अखेर येत्या 17 ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पाणजे येथील महिला व चारही गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिक कडकडीत उन्हात सहभागी झाले होते. उरण-पनवेल राज्य रस्त्यावरील पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील एसटी आणि एनएमएमटीची बस तसेच अवजड वाहनांची वाहतूक बंद केली आहे. ते जाऊ नये म्हणून दोन्ही साईडला हाईट गेट बसविण्यात आले आहे. त्यामुळे बोकडविरा, फुंडे,डोंगरी व पाणजे या चारही गावातील विद्यार्थी, कामगार, वयोवृद्ध नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जेएनपीटी कामगार वसाहतीजवळ किंवा द्रोणागिरी नोड आणि उरणमध्ये बससाठी ये-जा करावी लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने नाहक आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जनवादी महिला संघटनेच्या माध्यमातून गेली वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही सिडको याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जनवादी महिला संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. गुरुवार, दि.12 रोजी भर रस्त्यात नादुरुस्त पुलाजवळच आंदोलनास सुरुवात झाली. कडकडीत ऊन असूनही बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील महिला व ग्रामस्थ, सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरीही सिडको प्रशासन जुमानत नसल्याने अखेर महिला रणरागिणी बनून सिडको कार्यालयाला घेराव घातला. महिलांच्या आक्रमकतेपुढे झुकत येत्या 17 ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोकडवीरा सरपंच अपर्णा पाटील, पाणजे सरपंच लखपती पाटील, फुंडे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, कामगार नेते भूषण पाटील, मधुसूदन म्हात्रे, किसान सभेचे संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, डीवाय एफआयचे राकेश म्हात्रे, महिला संघटनेच्या प्रमिला म्हात्रे, सविता पाटील, कुसुम ठाकूर, कुंदा पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version