| मुरूड | प्रतिनिधी |
अपेक्षेप्रमाणे दीपावली नंतर आता रायगडच्या पर्यटनाला सुगीचे दिवस आलेले पहायला मिळत आहेत. राज्याच्या विविध भागातून प्रचंड संख्येने पर्यटक रायगडच्या समुद्र किनारी पर्यटन स्थळावर डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला उर्जितावस्था आल्याचे दिसून येत आहे. मुरूडचा ऐतिहासिक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग तर पर्यटकांनी फुलून गेला आहे.
कोर्लई, साळाव, बारशिव, काशीद, नांदगाव, सर्वे, मुरूड, खोरा बंदर जेट्टी, आगरदांडा जेट्टी, एकदरा खाडी, मुरूड समुद्रकिनारी भागातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि समुद्रात पोहण्याचा आनंदाने घेण्यासाठी आणि क्रीडा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. थंडी सुरू झाली असल्याने पर्यटन आधिक रोमांचित आणि रम्य झाले आहे. मुरुडचा जंजिरा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून फॅमिली बरोबर पर्यटक मंडळी उपस्थित झाल्याचं दिसून येत आहे.
सुट्टी असल्याने पर्यटकांच्या संख्येत तिपटीने भर पडत असून आम्ही जोडून रजा घेऊन आल्याचे पुणे येथून आलेल्या विराज काटकर, नारायण मुर्ती, नेहा पाटील, स्वाती नेरुरकर आदीनी सांगितले. रायगडात उत्तम समुद्रकिनारे असून येथील हिरवागार रम्य निसर्ग नेहमीच भावतो त्यामुळे आम्ही दिवाळीनंतर ऑफिस मधून खास रजा घेऊन या परिसरात हमखास येतो. अशा प्रतिक्रिया कोल्हापूर, सातारा, सांगली,पुणे मुंबई, जळगाव, येथून आलेल्या विजय जाधव, लता नेरपगार, शालिनी आठवले, राजेश सारंगधर अशा अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या.
मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर तर पर्यटकांची बेफाट उपस्थिती गुरुवार पासून वाढत गेली असून शुक्रवारी या मध्ये दुपटीने वाढ झाल्याची माहीती काशीद येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम, यांनी शुक्रवारी दुपारी दिली. येथे पार्किंग देखील अपुरे पडत असल्याचे दिसून आले. मुरूड किनार्यावर मात्र नियोजनबध्द विनामूल्य पार्किंग असल्याने रांगेत वाहने लावण्यांत आली आहेत. साळाव येथील गणेश मंदिर, बारशिव गावचा रॉक बीच, काशीद बीच, मुरूड येथील दत्त मंदिर, जंजिरा जलदुर्ग, कोर्लई किल्ला, नांदगाव येथील प्रसिद्ध साक्षात्कारी श्री सिद्धी विनायक मंदिर, नांदगांव समुद्र किनारा, मुरूड किनार्यावर पर्यटकांची मोठी मांदियाळी दिसून येत आहे.
आधिक माहिती घेता असे कळते की, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनार्यांवर पर्यटकांची उपस्थिती खूपच मोठी आहे. आगामी काळात शासनाने रायगडच्या सर्व पर्यटन स्पॉट वर महत्त्वाच्या आवश्यक सोयी-सुविधा केल्यास राज्यात रायगड जिल्हा पर्यटन हब होईल, अशा प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत.