थंडी झाली गायब, पुन्हा पावसाचा इशारा

पुणे | प्रतिनिधी |
समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठया प्रतीक्षेनंतर काही दिवसच अवतरलेली थंडी गायब झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात 16 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर जिल्ह्यांतही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राच्या मध्यावर असून, ते दक्षिण-पूर्व दिशेने पुढे जात आहे. दक्षिणेकडील राज्यांत पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातील दक्षिण भागात पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात वार्‍यांची चक्रीय स्थिती आहे. मात्र, आता अरबी समुद्रातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पूर्व-मध्य अरबी समुद्रात 17 नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, ते महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ असणार आहे. त्याचाही परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version