शीतगृह प्रकल्प पडलाय धुळखात

3 कोटींचा केलेला खर्च वाया
। जेएनपीटी । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या आंधळा दळतंय आणि कुत्रा पिट खातंय या कारभारामुळे 3 कोटी 42 लाख रुपये खर्चाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धुळखात पडला आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाचा वापर हा आंबट शौकीनांनी आपल्या दारु आड्यासाठी बनविला आहे. तरी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री अस्लम शेख यांनी सदर प्रकल्पाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी उरण तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी समाजाचे बांधव करत आहेत.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेसाठी राज्य सरकारने एन.सी.डी.सी. योजनेतून बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी 3 कोटी 42 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेने वेश्‍वी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 70 मधिल दिड एकर जमीन क्षेत्रावर बर्फ कारखाना आणि शीतगृह प्रकल्प उभारण्याचे काम मोठा गाजावाजा करत हाती घेतले. परंतु मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या भ्रष्ट कारभारामुळे वेश्‍वी ग्रामपंचायत हद्दीत उभा राहणारा मत्स्य व्यवसायाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धुळखात पडून राहिला आहे.

सदर प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेला 3 कोटी 42 लाख रुपये सरकारने राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेकडून वसूल करावेत आणि मत्स्य विभागातील भ्रष्ट अधिकारी वर्गाची सखोल चौकशी करावी.
जयवंत कोळी, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version