। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायनाला बुधवारी (दि.17) रायगडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालये, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी जन गण मनचे सूर लाखोजणांच्या मुखातून उमटले आणि सारे वातावरण भारावून गेले.
तिरंगा महोत्सवाची सांगता सामूहिक राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आहे त्या ठिकाणी दोन मिनिटे उभे राहून राष्ट्राप्रती आपली भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास उदंड प्रतिसाद लाभला.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल, पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सरकारी दवाखाना, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हजारोंच्या मुखातून जन गण मनचे स्वर उमटले.जयहिंदच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. जिल्ह्यातही सर्वच ठिकाणी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. सामान्य नागरिकानीही घरात उभे राहून राष्ट्रगीत आळविले.