कामकाजच्या वेळेत वारंवार कोसळतोय स्लॅब; न्यायाधीश, वकिलांवर न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड व दुरवस्था झाली आहे. इमारतीला चहूबाजूनी गळती लागली आहे. तर, महत्त्वाच्या असलेल्या न्यायाधीशांची खोली तसेच इतर दस्तऐवज ठेवण्याच्या खोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे रायगडकरांच्या तक्रारीचे निवारण करणार्या न्यायाधीश आणि वकिलांवर न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
येथील इमारत अखेरची घटका मोजत असून, शासनाने या इमारतीच्या दुरवस्थेचा आढावा घेऊन इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी येथील वकीलवर्गाकडून करण्यात येत आहे. इमारत जर्जर आणि धोकादायक स्थितीत असून, येथील स्लॅब सतत कोसळत असल्याने न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी जीव मुठीत घेऊन दिवस ढकलत आहेत. तसेच इथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने वकिलांकडून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
उच्च न्यायालयाचे वकील शाम कोंढाळकर यांनी सांगितले की, आमची इमारत धोकादायक बनली आहे. तक्रार निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून पक्षकार येतात, मात्र इथं इमारत मोडकळीस आली आहे. भिंतींना बुरशी लागल्याने आजार बळावण्याची भीती आहे. आमच्यासह इथे येणार्या पक्षकारांचा जीव धोक्यात आला आहे. येथे कोणत्याही सुविधा नाहीत, अनेक समस्यांनी वेढा घातला आहे. शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. सदरची इमारत दुरुस्त करावी आणि चांगल ग्राहक न्यायालय निर्माण करावे, अशी मागणी केली. तर वकील राजकुमार जगताप म्हणाले की, या इमारतीत न्यायदानाचे काम होते. मात्र, या इमारतीत कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. इथं स्वच्छतागृह नाही, गळती आहे, सतत स्लॅब कोसळत आहे. असह्य दुर्गंधी आहे. आम्ही रायगड जिल्हाधिकारी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सतत ही दुरवस्था निदर्शनास आणली, पण कुणीही लक्ष देत नाही, सदरची इमारत कोसळून दुर्घटना झाली तर जबाबदार कोण, असा सवाल जगताप यांनी विचारला.
महत्त्वाचे दस्तऐवज कागदपत्रे ठेवलेल्या खोल्यांमध्ये गळती लागल्याने कागदपत्रे खराब होण्याची परिस्थिती दिसून येतेय. तर सर्वच खोल्यातील भिंतीवर असलेल्या विद्युत बोर्डला पाणी लागत असल्याने विजेचा धक्का लागण्याची भीती व्यक्त केली जातं आहे. भिंतीला बुरशी चढल्याने दुर्गंधी पसरून कार्यालयीन स्टाप तसेच जिल्ह्यातून तक्रारी घेऊन आलेले नागरिक यांचा जीव घुसमटत आहे. अशा धोकादायक इमारतीत बसून आम्ही काम कसे करणार? या धोकादायक इमारतीत प्रवेश केल्यापासून वकिलांच्या शिरावर मृत्युची टांगती तलवार दिसून येते. इमारत कोसळून जीवघेणी दुर्घटना होण्याची वेळ आली असताना याकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जातं आहे. जिल्ह्यातील अन्य कार्यालयांचे जलद नूतनीकरण, सुशोभिकरण होत असताना केवळ ग्राहक तक्रार आयोगाकडून शासनाला कर मिळत नसल्यानेच इमारतीकडे दुर्लक्ष केले जातं असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.







