। तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील कासेवाडी येथील मांदाड रोड येथे अत्याधुनिक परम फुडस् अन्ड बेवरेज या फील्टर वॉटर कंपनी सुरू झाली. मागील तीन वर्षात या कंपनीने रायगड जिल्ह्यासह मुंबई ,ठाणे उपनगरात उत्तम दर्जाची सेवा आणि पाण्याच्या क्वालिटीमुळे नाव कमविले. अनेक पारितोषिक या कंपनीला मिळाली आहेत. या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. परंतु आजच्या घडीला महावितरणच्या गलथान कारभारामुळे या कंपनीवर स्थलांतराची वेळ आली आहे.
तळा तालुक्यातील वीजपुरवठा दररोज खंडित होत आहे. त्यामुळे उद्योगनगरीमधील विजेचा लपंडाव सुरू असून व्यवसायिक व नागरिक हैराण झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. मंगळवारी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा बंद असतो आणि इतर दिवशी विजेचा लपंडाव सुरू असल्याने या कंपनीला त्याचा मोठा फटका बसत असून आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.
पीटसई येथे एक्वल कंपनी असून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध उत्पादन सुरू असते. सकाळी मशीन सुरू केल्यावर मशीनच्या तापमानाचा समतोल साधेपर्यंत वेळ जातो आणि त्यात लाईट गेल्यावर पुन्हा तापमानाचा समतोल साधायला वेळ जातो आणि तिथून पुढे काम सुरू केले जाते. कंपनीमधील कर्मचारी वेळेत आले तरी दिवसाचे ठरलेले उत्पादन पूर्ण करायला वेळ लागतो. उत्पादन वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम तोटा सहन करावा लागतो.
महावितरण कंपनी सुरळीत सेवा देत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत विजेच्या लपंडवामुळे वेळेचे गणित जुळवून काम करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे कर्मचार्यांना तसेच बसून राहावे लागते. ज्या मशीनचे तापमान समतोल व्हायला वेळ लागतो अशा मशीन दिवसभर बंद ठेवाव्या लागतात.सध्या वीज पुरवठा अनियमित असल्याने उत्पादनाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑर्डर पूर्ण करताना खूप अडचणी येतात. असे पांडुरंग महाडिक यांनी सांगितले.
महावितरणच्या गलथान कारभारामुळे कंपनीला स्थलांतर करण्याची वेळ आली आहे बाजारातील दूध, डेअरी, आइस्क्रीम पार्लरचे व्यावसायिक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात महावितरण उपकार्यकारी अभियंता सुरेश घेवारे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला येथे रुजू होऊन आज आठ दिवस झाले माझ्याकडून अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.