आंदोलनाच्या इशार्‍यानंतर कंपनी वठणीवर ; शेकापचे युवा नेते निलेश थोरे यांच्या इशार्‍याची दखल

महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात
माणगाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर-माणगाव-लोणेरे टप्प्यात जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. खड्ड्यांमुळे होणारे अपघात हे अपघात नसून घातपात आहेत, त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करीत शेकापचे युवा नेते निलेश थोरे यांनी चेतक इंटरप्रायझेस कंपनीवर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. याची दखल त्वरित कंपनीने घेऊन इंदापूर, माणगाव, लोणेरेदरम्यान पडलेले खड्डे बुजविण्याचे काम जोरात सुरु केले आहे. त्यामुळे महामार्गावर जाणार्‍या प्रवाशांनी निलेश थोरे यांना धन्यवाद दिले आहेत.
गेले वर्षानुवर्षे महामार्गाचे काम चालूच असताना आतापर्यंत शेकडो लोकांना जीव गमावावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत असे असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी कुणीही आवाज उठवत नव्हते.

त्यातच 6 ऑगस्टला दोघांना जीव गमवावे लागल्याने युवा नेते निलेश थोरे यांनी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या बाबतीत विशेष लक्ष घातले. त्यांनी माजी आमदार पंडित पाटील यांच्या सूचनेनुसार सदरच्या मृत व्यक्तींचे उत्तरकार्य होण्याच्या आत जर रस्त्याचे खड्डे भरून वाहतुकीलायक रस्ता न झाल्यास 19 ऑगस्ट रोजी चेतक कंपनीच्या प्लांट माजी आमदार पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल चेतक कंपनीच्या पदाधिकारी यांनी घेऊन दि.9 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात केली.

Exit mobile version