स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी भारताचा पहिला सामना कुवैतशी
| मुंबई | वृत्तसंस्था |
फिफा अर्थात फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेसाठीचे बिगुल वाजले आहे. भारतात गेल्या काही वर्षात फुटबॉलची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. 2022 फुलबॉलविश्वचषक स्पर्धेवेळी ही लोकप्रियता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ फुटबॉलविश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेत पात्र होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. पात्रता फेरीत भारताच्या गटात कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे संघ आहे. या गटात टॉप 2 वर असलेले संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तर सौदी अरेबियात होणाऱ्या 2027 एएफसी आशियाई कपसाठी थेट प्रवेश मिळेल. पात्रता फेरीतील पहिला सामना भारत आणि कुवैत यांच्यात होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत फिफाविश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या टप्प्यात कधीच प्रवेश केलेला नाही. पण या वर्षी भारताची कामगिरी आणि कोच इगोर स्टिमकच्या मेहनतीमुळे आशा वाढल्या आहे. ग्रुपमधील तगडं आव्हान पाहता भारताला चांगली सुरुवात करणं महत्त्वाचं आहे.
फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीसाठी 36 संघांना 9 गटात विभागले गेले आहे. म्हणजेच एका गटात चार संघ आहेत.भारत, कतार, कुवैत आणि अफगाणिस्तान हे चार संघ आहेत. हे संघ घरच्या-बाहेरच्या मैदानावर राऊंड रॉबिन पद्धतीने खेळणार आहे. कतारचा संघ फिफा क्रमवारीत 61 व्या स्थानावर, कुवैत 136 व्या स्थानावर, अफगाणिस्तान 154 व्या स्थानावर, तर भारतीय संघ 102 व्या स्थानावर आहे. भारत आणि कुवैत यांच्यात गुरुवारी जबेर अल अहमद या आंतरराष्ट्रीय मैदानात सामना होणार आहे. त्यानंतर 6 जून 2024 रोजी हे दोन्ही संघ भारतात एकमेकांशी भिडणार आहेत.
भारतीय फुटबॉल संघ
गोलकीपर : अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ
डिफेंडर: आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, राहुल भेके, रोशन सिंग नौरेम, संदेश झिंगन, सुभाषीष बोस
मिडफिल्डर : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, लालेंगमाविया, लिस्टन कोलाको, महेश सिंग नौरेम, रोहित कुमार, सहल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजाम, उदांता सिंग कुमाम
फॉरवर्ड्स : इशान पंडिता, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, राहुल केपी, सुनील छेत्री
