करंजातील रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे

ठेकेदारावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
। उरण । वार्ताहर ।
करंजा पोलीस चौकी ते बाबदेव पाडा या रस्त्याचे काम सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे आहे. सदर रस्त्याला आताच तडे पडले आहेत. तरी सदर कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी चाणजे ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदारांनी नियमांची पायमल्ली करून कोणत्याही प्रकारची खोदाई न करता वरचेवर काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मटेरियलही निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाचा दर्जा खराब आहे. तसेच काँक्रिटीकरण झाल्यानंतर पाणी साचून ठेवण्यासाठी मातीचे चर रचणे आवश्यक असतानाही तसे न केल्याने सदर रस्त्याला काम पूर्ण होण्याआधीच तडे गेले आहेत.
सदर रस्त्याची देखरेख करण्यासाठी कोणताच शासकीय अधिकारी उपस्थित नसल्यानेच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. शासकीय पातळीवरील बहुतांश कामे ही निकृष्ट होत असल्यानेच ती काही दिवसांनी खराब होत आहेत. याबाबत तक्रारी करूनही कोणत्याच शासकीय अधिकारी वर्गांनी ठेकेदारावर कारवाई केल्याचे दिसत नाही. यावरून शासकीय पातळीवर विकासाच्या नावाने कामे काढून नियमांची पायमल्ली करून कामे पूर्णत्वास नेली जातात.
यामध्ये ठेकेदार व अधिकारी वर्ग यांचा रॅकेट आर्थिक संबंधातून कार्यरत असल्यानेच विकासकामांचा बट्ट्याबोळ होत आहे. तरी ठेकेदार व अधिकारी वर्ग यांच्या मालमत्तेची चौकशी केली तर नक्कीच विकासकामांचा घोटाळा उघड होईल. तरी शासकीय अधिकारी वर्गांनी या काँक्रिटीकरण रस्त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी चाणजे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Exit mobile version